वेळ पडली तर स्वतंत्र राजकीय आघाडी काढण्याची भूमिका केली जाहीर
-शहापूर आगामी राजकीय भूमिका
ठरवण्यासाठी ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे नेते दयानंद दादा चोरघे यांनी त्यांच्या समर्थकांच्या बैठका सुरू केल्या असून शहापूर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांची बैठक आगरी समाज हॉल शहापूर येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाली.
कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या सात महिन्यापासून दयानंद चोरघे यांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतली नव्हती. सत्ताधारी पक्षांनीही त्यांना त्यांच्या पक्षाची द्वारे खुली केली असली तरी कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशीच भूमिका घेणार असल्याचे यावेळी दयानंद चोरघे यांनी सांगितले. ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये माझे समर्थन करणारे कार्यकर्ते हीच माझी ताकद असून जर कोणताच राजकीय पक्ष कार्यकर्त्याचे समाधान करणार नसेल तर वेळ पडल्यास संगमनेर सेवा समिती सारखा प्रयोग ठाणे जिल्ह्यात करून ठाणे जिल्हा ग्रामीण सेवा समितीच्या माध्यमातून राजकीय आघाडी स्थापन करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्या पक्षात काम केले तो पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले मात्र पक्ष नेतृत्वास स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची किंमत राहिली नाही, जिल्हा व तालुका नेत्यांचा फक्त वापर केला जात असल्याचा आरोप करून राज्यातील काँग्रेस पक्ष आता राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या विचाराचा राहिला नसल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माघार घेतात हे कोणाचे अपयश आहे असे विचारून त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली. यापुढे समर्थक कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यावेळी शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष जयकुमार करण, कल्याण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, भिवंडी तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष संतोष ठाकरे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव गगे, सोशल मीडियाचे शहापूर तालुका अध्यक्ष महेंद्र आरज, अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष अब्दुल शेख, शहापूर शहराध्यक्ष संजय तांबोळी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रविंद्र भोईर, कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष किशोर पानसरे, तालुका उपाध्यक्ष रामदास भोईर, डोळखांब शहर अध्यक्ष सिकंदर शेख, निवृत्त पोलीस कर्मचारी मदे यांच्यासह अनेकांनी दयानंद चोरघे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे मनोगतातून व्यक्त केले.
बैठकीचे आयोजक व माजी उपसभापती महेश धानके यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. यावेळी तालुक्यातील सर्व भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित असल्याचे दिसून आले. वयानंद चौरघे जी राजकीय भूमिका घेतील ती राजकीय भूमिका आम्हाला मान्य असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी जाहीरपणे सांगितले.


