सॅटिस पूलाबाहेरील स्कायवॉकचे तुटलेले पत्रे बदलण्याचे काम सुरू

भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांच्या प्रयत्नांना यश

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सेंटिस पुलाच्या स्कायवॉकवरील छताचे पत्रे तुटल्यामुळे नागरिकांना छत्री घेऊन चालावे लागत असल्यामुळे होत असलेल्या हालांची दखल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी घेऊन महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्यानंतर तातडीने स्कायवॉकवरील छताचे पत्रे बदलण्याचे काम सुरू झाले. तर स्कायवॉकवरील लाद्या बदलण्याच्या कामासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सेंटिस पूलावरून गावदेवी मंदिर आणि एस. टी. स्टॅण्डकडे जाण्यासाठी दोन स्कायवॉक उभारण्यात आले आहेत. या स्कायवॉकवरील लाद्या निखळल्या असून, छतावरील पत्रे तुटल्यामुळे पावसाचे पाणी पूलावर पडत होते. त्यामुळे स्कायवॉकवरुन जाणाऱ्या हजारो प्रवाशांना छत्री घेऊन प्रवास करावा लागत होता. काही ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे प्रवाशी घसरण्याची शक्यता होती. त्याबाबत अनेक प्रवाशांनी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर महापालिकेकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला होता.
स्कायवॉकवरील पत्रे बदलण्याबरोबरच तुटलेल्या लाद्या बसवाव्यात, यासाठी नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडून महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर आजपासून स्कायवॉकवरील पत्रे बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तर नवीन लाद्या बसविण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली.

Scroll to Top