‘उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे अंबरनाथच्या भाजपा नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांचा पाठपुरावा
अंबरनाथ शहराची वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि विस्तारित भागातील वाढती वाहतूक लक्षात घेता चिखलोली परिसरात प्रस्तावित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीची आवश्यक जागा अंबरनाथ नगरपालिकेला निशुल्क हस्तांतरित करावी, अशी मागणी अंबरनाथच्या भाजपा नगराध्यक्षा तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
अंबरनाथ शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार चिखलोली परिसरातील पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या ३० मीटर रुंद विकास योजना रस्त्यांतर्गत रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रस्तावित आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच नागरिकांची सुरक्षितता, आपत्कालीन सेवांची उपलब्धता आणि औद्योगिक व निवासी भागांमधील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे नगराध्यक्षा करंजुले-पाटील यांनी म्हटले आहे.
सध्या अंबरनाथ शहरात एकमेव प्रमुख उड्डाणपूल असल्याने विस्तारित भागातील नागरिकांना अनेकदा वळसा घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च होत असून वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. मोरीवली परिसरात रेल्वे रूळ ओलांडून जाणाऱ्या शाळकरी मुलांसह कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
चिखलोलीतील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलासाठी एमआयडीसीच्या मालकीची काही जागा आवश्यक आहे. या जागेच्या हस्तांतरणासाठी आवश्यक शुल्क आणि अटींबाबत एमआयडीसी प्रशासनाकडून नगरपालिकेला कळविण्यात आले आहे. मात्र, सध्या नगरपालिका पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते विकास, स्वच्छता, आरोग्य आणि अन्य नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत आहे.



