देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्या असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणात काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अओकेइजाम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भिवंडीत भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा कल्पना शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या आंदोलनात प्रदेश सचिव सुनीता टावरे, पदाधिकारी मानसी राजे, लावण्या चिलवेलवार, शीला बेडगे, वैशाली पाटील, लता वाघमारे अक्षदा मोईली आदी सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेस खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अओकेइजाम यांच्यावर विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे आरोप चौकशीत सिध्द झाले असून, विद्यापीठाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. ज्या व्यक्तीवर विद्यार्थिनींच्या छळाचे इतके गंभीर आरोप सिध्द झाले आहेत, त्यांना संसदेत लोकप्रतिनिधी म्हणून बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे डॉ. बिमोल अओकेइजाम यांनी खासदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा, काँग्रेस पक्षाने त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी, पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा मागण्या भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा कल्पना शर्मा यांनी केल्या आहेत.
भिवंडीत काँग्रेस खासदाराच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चाची निदर्शने



