आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्कालीन व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी तसेच मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती स्तरावरील आपत्कालीन कक्ष २४ तास सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनिष जोशी, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी तडवी तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले की, मान्सून कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनुष्यबळाची कमतरता भासता कामा नये. शहरातील कोणत्याही भागातून मदतीचा संदेश प्राप्त होताच संपूर्ण यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचेल, यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच आपत्कालीन कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची व्यवस्थित नोंद ठेवण्यात यावी. संबंधित तक्रारीवर कोणती कार्यवाही करण्यात आली याची माहिती तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. प्राप्त झालेल्या तक्रारीचे पूर्णपणे निवारण होईपर्यंत त्याचा सातत्याने आढावा घेण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात विविध विभागांमध्ये समन्वय राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद करत महावितरण आणि पोलीस विभागाचे समन्वयक आपत्कालीन कक्षात उपलब्ध ठेवण्याबाबत नियोजन करण्यास सांगण्यात आले.तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांमध्येही परस्पर समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी महापौरांनी टीडीआरएफच्या तयारीबाबतही माहिती घेतली. शहरातील एखाद्या भागात गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती तात्काळ महापौर, उपमहापौर, पदाधिकारी तसेच संबंधित भागातील स्थानिक नगरसेवकांना देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नव्याने निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची अद्ययावत यादी आपत्कालीन विभागात उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत पोलीसांच्या माध्यमातून शहरात 6500 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासंदर्भात पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या विभागात सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचना सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी यावेळी केली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात 10 हंटिंग लाईन्स आणि
13 हॉटलाईन्स कार्यरत आहेत. तसेच येथे कार्यरत असलेले सर्व मनुष्यबळ प्रशिक्षित असून त्यांना कामाचा अनुभव आहे. 1 जूनपासून प्रभाग स्तरावर आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. आतापर्यंत शहरातील झाडांच्या छाटणीचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून मान्सून कालावधीत पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी 25 बोटी सज्ज ठेवण्यात आल्या असल्याचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी नमूद केले.
आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनीही पालन करावे, असे आवाहनही उपायुक्त गोदेपुरे यांनी यावेळी केले.


