‘सहकार’चे ८ उमेदवार बिनविरोध
ठाणे – दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन `सहकार पॅनल’ ची घोषणा केली. सहकार पॅनलचे यापूर्वीच ८ उमेदवार संचालक पदी बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित सर्व जागा `सहकार पॅनल’ जिंकेल असा विश्वास सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर, आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष अरुण पाटील, विद्यमान संचालक भाऊ कुऱ्हाडे, सुभाष पवार, दिलीप पटेकर, अनिल मुंबईकर, निलेश भोईर, भाजपा उपाध्यक्ष राम दळवी, शिवसेना सचिव, ठाणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, सभागृह नेते हणमंत जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले. खासदार नरेश म्हस्के म्हणले की, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कधीही पक्षीय राजकारण आम्ही केले नाही. दिघे साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत कधीही शिवसेना पक्ष म्हणून यात उतरला नाही. विविध पक्षांशी चर्चा करून कुठेही पक्षीय राजकारण न करता शक्यतो बिनविरोध निवडणूक कशी होईल याकडे आमचा कल होता. मात्र चर्चा चालू असताना काहींनी पॅनल जाहीर केले. मग आम्ही सहकार हित डोळ्यासमोर ठेवत `सहकार पॅनल’ खाली निवडणूक लढवत आहोत, असे खासदार नरेश म्हस्के म्हणले.
सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वपक्षीय मंडळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक एका विचाराने लढवत आहोत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खूप मोठे योगदान ग्रामीण आणि शहराच्या विकासात आहे. एक चांगला संदेश सर्वसामान्य जनतेत जाण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय `सहकार पॅनल’ उभे करत असल्याचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे म्हणाले.
विद्यमान संचालक मंडळाने उत्तमरीत्या बँक चालवली आहे. महाराष्ट्रामध्ये एक नंबर तर भारतामध्ये दोन नंबरची आपली बँक आहे. विरोधी पक्षाने देखील कबुल केले आहे की, विद्यमान संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. १७ जून रोजी माघार घ्यायचा दिवस आहे. विरोधकांनी आपला उमेदवारी मागे घेऊन चांगल्या कामासाठी हातभार लावा, असे आवाहन क्षितिज ठाकूर यांनी केले.
गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये माझा सहभाग आहे. आजपर्यंत कधीही बँकेमध्ये राजकारण कुठल्याच पक्षाने आणले नव्हते. अचानकच काय झालं काय कळलं नाही त्याच्या अगोदर एक पॅनल जाहीर झाले. आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं त्याच्यामुळे आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून एकत्र आल्याचे आमदार किसन कथोरे म्हणाले.
भले वेगवेगळे पक्षातले असेल तरी अनेक नेते ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घडवले गेलेले आहेत. या ठिकाणी पक्ष बाजूला सारून फक्त आणि फक्त बँक कशी सक्षम होईल, बँकेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही लक्ष देत होतो. बँकेमध्ये चांगले काम करणारे प्रतिनिधी यांना पाठिंबा द्या हि एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. म्हणूनच सहकार पॅनलच्या माध्यमातून आठ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. सत्ता तर शंभर टक्के तर येणारच आहे परंतु सर्वच्या सर्व सहकार पॅनलचे उमेदवार संचालक म्हणून निवडून आणण्यासाठी आमचा भर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


