भिवंडीतील युवासेनेला धक्का

महानगर प्रमुख मोहन पठाडे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

भिवंडीचे युवासेना महानगर प्रमुख मोहन मच्छिंद्र पठाडे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. हा प्रवेश युवासेना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

युवासेना कॉलेज कक्षापासून सक्रिय असलेल्या मोहन पठाडे यांनी ठाणे जिल्ह्यात महाविद्यालयीन संघटन उभारणी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलने, रस्ते, पाणी तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या उमेदवारांसाठी ठाणे-कोकण प्रभागात मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी, निवडणूक नियोजन आणि प्रभावी रणनीती राबविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

‘तसेच युवासेनेत कार्यरत असताना आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दीर्घकाळ संघटनात्मक काम केले अत्यंत निकटवर्ती असून युवकांमध्ये आक्रमक व प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोहन पठाडे हे आमदार रुपेश म्हात्रे यांचे खंदे समर्थक म्हणून
ओळखले जातात. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना विधानसभा प्रमुख निखिल काळे, जुगल दिवेकर, उपशहर प्रमुख रणजित चौधरी, मोहिन मोमीन, मोहसीन शेख तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश प्रसंगी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख निखिल वाळेकर, युवासेना सहसचिव ओंकार चव्हाण, लोकसभा उपाध्यक्ष तेजस सांगळे, जिल्हा अधिकारी लवेश नाईक, विधानसभा प्रमुख छायांक रुपेश म्हात्रे, विराज पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. भिवंडीतील युवकांमध्ये प्रभावी संघटन उभारणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मोहन मच्छिंद्र पठाडे यांच्या या प्रवेशामुळे भिवंडीतील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top