बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही

बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परभणीतील मेळाव्यात आश्वासन

दुष्काळाच्या संकटात राज्यातील गोरगरिब शेतकरी आणि लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही. बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, असे आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गांधी पार्क मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. संकटकाळात शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवू, कर्जपुनर्गठन करु तसेच चाऱ्याची व्यवस्था करु. संकटात शेतकऱ्यांसाठी शिवसेना १०० टक्के समाजकारण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षाच्या सेवा पर्वानिमित्त शिवसेना राज्यभरात सेवा से समर्पण ही गौरव यात्रा काढणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज परभणी जिल्ह्यातून झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या मुलांना २५०० सायकली आणि लाडक्या बहिणींना २५०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. या मेळाव्याला खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, आमदार सईद खान व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज दुष्काळाचे सावट आहे. लाडका भाऊ आणि लाडकी बहिण संकटात असल्याची आपल्याला जाणीव आहे. दुष्काळाच्या सावटात बळीराजाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवसेनेच्या माध्यमातून काही ना काही मदतीचा हात दिला पाहिजे.

Scroll to Top