ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कावेसर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण, तसेच चौकाच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (१७ ऑक्टोबर) करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला सभागृह नेते हणमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेविका कमल चौधरी, अर्चना मणेरा, विक्रांत तांडेल यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
कावेसर येथील चौकाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चौकाचे नामकरण करून या ठिकाणी महाराजांचा जिरेटोप बसविण्यात आला असून, चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून भावी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी, देशासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांच्या कार्याची जाणीव व्हावी आणि त्यांच्या विचारांतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावी, हा चौक उभारण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा स्मारकांचे आणि चौकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कावेसर येथील या चौकामुळे नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमामुळे कावेसर परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्यासोबतच ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
यावेळी नेहा देवळे व प्रसाद देवळे यांनी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या आरतीचे गायन केले. तसेच यावेळी शर्वरी जगताप, शरयू जगताप व शर्वी घाटे या तरूणींने तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले, त्यांचेही कौतुक खासदार नरेश म्हस्के यांनी केले. तसेच महानगरपालिकेचे उप अभियंता रोहित गुप्ता कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर, अभय मिलखे पाटील यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.



