कल्याण स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांना महापौरांची तंबी

कल्याण स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांना महापौरांची तंबी

कल्याण शहर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध बनविण्याच्या उद्देशाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी सोमवारी  कल्याण रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेतला. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना तसेच बेशिस्त रिक्षाचालकांना त्यांनी कडक शब्दांत तंबी दिली. यावेळी नगरसेवक प्रतिक पेणकर, रिक्षा संघटनेचे संतोष नवले, जितेंद्र पवार उपस्थित होते.  

कल्याण स्थानक परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या भागातील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना आणि प्रवाशांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच परिसरात स्वच्छता आणि शिस्त कायम राहावी, यासाठी महापौरांनी पाहणी दौरा केला. यावेळी वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे तसेच रिक्षांच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधितांनी नियमांचे पालन करावे, असे त्यांनी बजावले.

कल्याण शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि स्थानक परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या कठोर उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. “नागरिकांची गैरसोय खपवून घेतली जाणार नाही. शहरात शिस्त, स्वच्छता आणि विकासाला प्राधान्य देऊन कल्याण स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध बनविण्यासाठी ठाम भूमिका घेतली जाईल,” अशी भूमिका महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी यावेळी मांडली.

Scroll to Top