ठाणे – भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. चार वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा ठाण्यात शिवसेनेच्या वतीने जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
ठाणे महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. महापौर शर्मिला पिंपळोलकर व शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या सर्व नगरसेविका व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. संतप्त महिलांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, “अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान नाही,” असे स्पष्ट मत मांडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आंदोलना दरम्यान केली. तसे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आंदोलकांनी आरोपीच्या पुतळ्याला जोडे मारुन त्याचे दहन केले.



