कल्याण – पावसाळा तोंडावर आला असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अद्यापही मोठ्या नाल्यांच्या नालेसफाईला सुरवात न झाल्याने या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातील जरीमरी नाल्यात देखील कचरा साचल्याने या नाल्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले असून साचलेल्या या कचऱ्यात क्रिकेट खेळत मनसेने केडीएमसीच्या नालेसफाईची पोलखोल केली आहे. लवकरात लवकर नालेसफाई न झाल्याने महापौर दालनात कचरा टाकण्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी दिला आहे.
पॅनल क्रं ९ मल्हार नगर परिसरातील गणेश नगर, जोशी बाग, जरीमरी तसेच झुंजारराव मार्केट येथून जाणारा मोठा नाला कचराने पूर्णपणे भरला आहे. परंतु पहिले या नाल्यात जेसीबी किंवा पोखलन द्वारे नाला साफ होत होते. परंतु नाल्यावरील अनाधिकृत बांधकामामुळे हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शक्य होत नाही. या नाल्यातील गाळ कशा पद्धतीने काढला जाईल व कधी काढला जाईल यावर मोठा प्रश्न निर्माण होत आहे. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत आहे अजून पर्यंत सुद्धा पावसाळा अगोदर नाले साफ करणारे कंत्राटी कामगार हे कुठेही गटार साफ करताना दिसत नाही.
पावसाळाच्या सुमारास नाले वेळेवर साफ न झाल्याने जोशीबाग, मल्हार नगर, गणेश नगर, चिखले बाग या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर मोठा नाला तसेच प्रभागातील अंतर्गत लहान नाले लवकरात लवकर साफ करण्यासाठी कंत्राटी कामगार नेमण्यात यावे तसेच मोठा नाला बंदिस्त करण्याचे किंवा वरील स्लॅब टाकण्याचे काम बऱ्याच ठिकाणी चालू आहे परंतु हा बंदिस्त नाला महानगरपालिका कश्याप्रकारे साफ करतात हे देखील नागरिकांना दाखवून द्यावे अन्यथा मोठ्या नाल्यावर स्लॅब टाकण्यास मनसेचा विरोध असून नालेसफाई लवकरात लवकर न झाल्यास नाल्यातील कचरा महापौर दालनात टाकण्याचा इशारा मनसेने दिला आहे.


