डम्पिंग ग्राउंड वरील जप्त गुटखा चोरी 

राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक आंदोलनात गुटखा जाळून निषेध 

भिवंडी – भिवंडी शहर हे गुटखा व अमली पदार्थ विक्री व वितरणाचे मुख्य हब बनले असून पोलिस यंत्रणा सोयीस्करपणे या बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शहर नशाबाज होत चालले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केला आहे. 


भिवंडीत गुटखा व अमली पदार्थ बंदीचा फार्स केला जात असल्याने त्या विरोधात प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आसबीबी येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने करीत गुटखा व प्रतिकात्मक अमली पदार्थांची होळी करून निषेध व्यक्त केला. या आंदोलनात शहर पदाधिकारी आमिर फारूखी, फहाद अंजुम, बलविरसिंग अहुलवालिया, महेश येमुल, शमीम अन्सारी, अंजुम शेख, शमीम खान यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.     

   १० एप्रिलच्या रात्री भिवंडी शहरातील कचरा टाकल्या जाणाऱ्या चाविंद्रा येथील डंपिंग ग्राऊंडवर गुन्हे शाखेने जप्त केलेला ६५ लाख रुपये किमतीचा गुटखा नष्ट करीत खड्यात गाडल्यानंतर त्याच रात्री तेथून गुटखा चोरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला. विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात पोलिस प्रशासनाची भूमिका राजकीय दबावामुळे बोटचेपी झाली असल्याचा आरोप केला जात आहे. यासोबत नुकताच गोदाम भागात कोट्यवधी रुपयांचा कोकेन जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमुळे भिवंडी शहर गुटखा व अमली पदार्थांचे हब बनत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top