आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा दोन महिन्यांचा राज्यव्यापी दौरा

२२ जिल्हे आणि १०० मतदारसंघांत थेट संवाद

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आढावा घेणार आहेत.

शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. ३० मार्चला ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरात यशस्वी संवाद दौरे पूर्ण केले असून त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही संघटन – बांधणीसाठी दौरे केले होते.

पुन्हा एकदा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती, तसेच शिवसेनेच्या विविध आघाड्या आणि विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांबाबतही सविस्तर चर्चा होणार आहे.

या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. संघटनात्मक अडचणी, स्थानिक प्रश्न, निवडणुकीतील आव्हाने आणि पुढील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढवणे, प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या राज्यव्यापी दौऱ्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top