नालेसफाई कुठे ? नागरिकांमध्ये चर्चा
अंबरनाथ नगरपालिका हद्दीत भौगोलिक रचनेनुसार उंच-सखल भागात तत्कालीन नैसर्गिक ओढे-नाल्यांची मानवनिर्मित दिशा बदलून अरूंद ‘नागमोडी’ झाल्याने आपती व्यवस्थापन आराखड्यात सुमारे १५ रहिवासी वस्तीभाग हे पाण्याखाली जात असल्याने येथील नागरिक पावसाळ्यात एकतर घर सोडून भाड्याच्या घरात राहायला जातात, तर काहीजण धोका पत्करून पूरसदृश्य परिस्थितीत सामना करत असतात. अशा परिस्थितीत यंदा नालेसफाई कुठे? अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान यंदा अंबरनाथ नगरपालिकेमार्फत आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्वतंत्ररित्या सुरू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये २४ तास कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. नालेसफाईचे काम प्रगतीपथावर असून विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण ७० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी केला आहे. संभाव्य पावसाळी धोका लक्षात घेऊन उर्वरित नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या आहेत. काही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी टोल फ्री नं. 18002331106 त्याचप्रमाणे 0251-268235/0251-2682400 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने केले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा पुस्तीका तयार केली आहे. त्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदत आणि संपर्क फोन नंबरसह अग्निशमन विभाग प्रमुख भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शना खाली आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असुन रेस्क्युबोट, लाईफ जॅकेट, इलेक्ट्रीकल वुड कटर, लाईफ रिंग पाईप स्टेचर, अॅस्का इन्फटेबल लाईट फायर ब्लॅकेट अशा विविध २२ सहित्यासह यंत्रणा सज्ज केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कक्षात ५ ऑक्टोंबर पर्यंत अधिकारी व कमर्चारांची सेवा सुरू राहणार आहे. या नैसर्गिक आपत्ती निवारण समिती अध्यक्ष म्हणुन नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील तर सदस्य सचिव म्हणुन मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्यासह अधिकारी या समिती मध्ये कार्यरत असतील.


