नमुंमपा आरोग्य विभागामार्फत टीबी मुक्त भारत १०० दिवसांची विशेष माहिम

नवी मुंबई – जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने दिनांक २४ मार्च २०२६ पासून “टीबी मुक्त भारत” या राष्ट्रीय उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी १०० दिवसांची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. क्षयरोग निर्मुलनासाठी गती देण्याकरीता टीबी मुक्त भारत अभियान मोहिम राबविण्यात येत असून या अभियानाचा उद्देश लपून असलेले टीबी रुग्ण शोधून लवकरात लवकर उपचारावर आणून टीबी मृत्यू कमी करणे तसेच समाजामध्ये व्यापक जनजागृती निर्माण करणे हा आहे.

या १०० दिवसांच्या अभियानादरम्यान ६० वर्षावरील नागरिक, मधुमेह असलेले, क्षयरुग्णांचे सहवासित, क्षयरोगाचे उपचार घेतेलेले रुग्ण, १८.५ पेक्षा BMI कमी असलेले व्यक्ती इ. जोखमीच्या गटांमध्ये क्षयरोगाचा धोका जास्त असल्याने अभियान अंतर्गत छातीचा एक्सरे द्वारे तपासणी करण्यात येत आहे. सदर सेवा देण्याकरीता कार्यक्षेत्रात आयुष्मान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये इतर आरोग्य सेवा जसे की मधुमेह तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, कुष्ठरोग तपासणी इ., करण्यात येते तसेच संशयित रुग्णांची मोफत तपासणी व त्वरित निदान, टीबी रुग्णांना नियमित औषधोपचार व पोषण सहाय्य (निक्षय पोषण योजना), शाळा, महाविद्यालये व समुदाय पातळीवर जनजागृती कार्यक्रम, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व आरोग्य संस्थांशी समन्वय वाढविणे इ. महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. नमुंमपा कार्यक्षेत्रात दि.२४ मार्च २०२६ पासून एकूण ७९ आयुष्मान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये एकूण ७९०१ लाभार्थ्यांनी शिबीरांचा लाभ घेतला आहे.

क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. मात्र, वेळेत निदान व उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, वजन घटणे, ताप येणे, रात्री घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी.

या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मा. आयुक्त नमुंमपा यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top