भिवंडी – भिवंडी बस स्थानकाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. कल्याण, ठाणे, मुंबई, वसई, वाडा या शहर व ग्रामीण भागांना जोडणारे महत्वाचे बस स्थानक म्हणून भिवंडी बस स्थानक ओळखले जाते. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून चाकरमानी, विद्यार्थी व प्रवासी असे रोज १० ते १२ हजार अशा प्रकारे महिन्याला तीन ते साडेतीन लाख प्रवासी भिवंडी बस स्थानकातून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर प्रवास करतात. भिवंडीत प्रवासाची इतर साधने नसल्याने अनेक प्रवाशांना बस स्थानकातील बसने प्रवास करावा लागतो. मात्र बस स्थानकात कोणतीही सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे भिवंडी बस स्थानकाची इमारत महापालिकेने मागील अनेक वर्षांपासून धोकादायक ठरवली आहे. मात्र तरीही या धोकादायक इमारतीतूनच बस स्थानक चालविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी देखील आपला जीव मुठीत घालून कर्तव्य बजावत आहेत. इमारत धोकादायक झाल्याने प्रवाशांबरोबरच कर्मचाऱ्यांनाही कोणतीही सुविधा या आगारात मिळत नाही. बस स्थानकांमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा मिळाव्यात तसेच बस स्थानकात स्वच्छता राहावी यासाठी शासनाने एसटी महामंडळाच्या वतीने ‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ हे अभियान सुरु केले. बस स्थानकांची साफसफाई, सौंदर्यीकरण व नागरिकांसाठी सुविधा यामध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा हेतू आहे. मात्र एसटी महामंडळाच्या या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात भिवंडी बस स्थानक नापास झाले आहे. ज्याचे कोणतेही सोयरसुतक आगार प्रशासनाला नाही.
कॅन्टीन व पिण्याच्या पाण्याची सुविधाच नाहीभिवंडी बस स्थानकातून आदिवासी दुर्गम भागातील शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांना अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सोय आगारात नाही. आगारातील कॅन्टीन मागील काही दिवसांपासून बंद आहे. तर आगारात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एका सामाजिक संस्थेने आगारात पाणपोयीची सोया केली होती मात्र देखभाल दुरुस्ती नसल्याने ही पाणपोई मागील अनेक वर्षा पासून बंद आहे. त्यामुळे घसा कोरडा आणि उपाशी पोट ठेवूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.आगारात स्वच्छतेचा अभाव बस स्थानकात प्रचंड अस्वच्छता असून प्रवाशांना बसण्यासाठी असलेले सिमेंट व लादीचे बाकडे देखील तुटले आहेत. बाकड्यांची साफ सफाई होत नसल्याने प्रवासी या बाकड्यांवर न बसता अनेक वेळा ताटकळत उभेच राहण्याची वेळ प्रवाशांवर येते. येथील स्वच्छतागृह देखील अस्वच्छ असून स्वच्छतागृहात पाण्याची सोय नाही. त्यामुळे मुतारीत केवळ क्लोरीनयुक्त पावडर टाकून स्वच्छता केल्याचा आव आणला जात आहे. फक्त हात धुण्यासाठी एक नळ स्वच्छतागृहात बसवण्यात आला आहे. या नळावर देखील बुरशी व मळ साचलेला आहे. बस स्थानकाची रंगरंगोटी मागील अनेक वर्षांपासून झाली नसल्याने हे बस स्थानक एका खंडर सारखे पडीक वाटते.
सुरक्षेचा अभाव व भटक्या कुत्र्यांचा वावर भिवंडी बस स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असून येथे सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. अनेक वेळा बस मध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या पाकीट मारीच्या घटना बस स्थानकात घडत असतात. तर बस अगराच्या आत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या भटक्या कुत्र्यांमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
बस आगारातील कर्मचारी सेवा सुविधांपासून वंचित
भिवंडी बस स्थानकात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. लांब पल्ल्यावरून बस चालवत आलेल्या चालक व वाहकाला अराम करण्यासाठी या आगारात कोणतीही सुविधा नाही. ना पलंग ना गाड्या. धोकादायक अगराच्या पहिल्या माळ्यावर कर्मचाऱ्यांना लाद्यांवर झोपावे लागत आहे. तर काही कर्मचारी पहिल्या मजल्यावर असलेल्या पत्र्याच्या हॉल मध्ये धुळीवर केवळ बॅनर अथवा इतर मळकट कपडा टाकून झोपत असतात. कर्मचारी जिथे झोपतात तिथे प्रचंड धूळ व अस्वच्छता आहे. बस स्थानकातील कर्मचाऱ्यांना अंघोळ करण्यासाठी असलेल्या बाथरून मध्ये अनेक वेळा पाण्याचा अभाव असतो. तर येथील टॉयलेट अनेक दिवसांपासून अस्वच्छ आहेत. एमर्जन्सी मध्ये याच घाणेरड्या टॉयलेटचा वापर या कर्मचाऱ्यांना करावा लागतो. इमारत धोकादायक असल्याने छताचे प्लास्टर एका कर्मचाऱ्याच्या खांद्यावर कोसळल्याची घटना देखील काही दिवसांपूर्वी या आगारात घडली आहे. त्यामुळे येथील कर्मचारी आपला जीव मुठीत धरून कर्तव्य बजावत आहेत. आगारात लांबच्या पल्याच्या केवळ दहा गाड्या नव्या आहेत बाकी इतर सर्व गाड्या जुन्याच आहेत. ज्या अनेक वेळा रस्त्यातच बंद पडतात त्यामुळे प्रवाशांबरोबरच बस कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होतात.
बस स्थानकातील डिझेल बस या सीएनजी मध्ये कन्व्हर्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालक जिथे बसतो त्या ठिकाणी प्रचंड गरम वाफ बाहेर पडत असते त्यामुळे चालकांचे पाय अक्षरशः काळे पडले आहेत.
भिवंडी बस स्थानकाची वाईट अवस्था; अस्वच्छ हॉल, तुटके फरशी अन् सुविधाविना प्रवाशांचे हाल



