विकासाच्या वाटचालीत चेंदणी कोळीवाड्याची ओळख जपली जावीचेंदणी कोळीवाडा ट्रस्टचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

newspaper (3)

ठाणे – महाराष्ट्र शासनाच्या २९ जानेवारी २०२६ च्या निर्णयानुसार कोकण विभागातील कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्याचेही सीमांकन प्रस्तावित आहे. मात्र, स्थानिक कोळी समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय ही प्रक्रिया राबवू नये, अशी   मागणी चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, विकासाच्या नावाखाली कोळीवाड्याच्या अस्तित्वावर घाला येणार नाही ना, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अर्बन रिन्यूअल (क्लस्टर) योजना, भूमिगत मेट्रो, रेल्वे लाईन समांतर रस्ते, कोस्टल रोड तसेच पटणी ते कोपरी पूल या प्रकल्पांचा फटका चेंदणी कोळीवाड्याच्या मूळ वसाहतीला बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

यापूर्वी ट्रान्स हार्बर रेल्वे प्रकल्पामुळे अनेक घरांवर परिणाम झाला असून, सातत्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय आणि कोळी समाजाची जीवनशैली धोक्यात आली आहे. त्यामुळे सीमांकन करताना केवळ जमीन नाही, तर जीवनपद्धतीचं संरक्षण आवश्यक असल्याची भूमिका ट्रस्टने मांडली आहे.

प्रस्तावित सीमांकनात विस्तारित गावठाण, मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागा, कांदळवने, खाजणे, होड्या व जाळी ठेवण्याच्या जागा, पारंपरिक वहिवाटीचे मार्ग, अंतर्गत रस्ते, सामायिक मोकळी क्षेत्रे तसेच ग्रामदैवत व मंदिर परिसर यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चेंदणी कोळीवाडा हा ठाण्याच्या मूळ संस्कृतीचा आधारस्तंभ मानला जातो. येथे कार्यरत सहकारी मासेमारी संस्था केवळ अर्थकारण नव्हे, तर परंपरेचा वारसा जपतात. त्यामुळे विकासाच्या आराखड्यात कोळीवाड्याचे संवर्धन होणे आणि कोळी समाजाचे अस्तित्व टिकून राहणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर निवेदन देताना चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष अमरीश ठाणेकर, सीमांकन समिती सदस्य सचिन ठाणेकर आणि आनंद कोळी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top