मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात तापमान वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. हिट व्हेव किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. साधारणपणे एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात. यामध्ये माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात.
लक्षणे:-
अति उष्णता आणि घामः सुरवातीला खूप घाम येतो, पण प्रकृती बिघडल्यास घाम येणे बंद होऊन त्वचा कोरडी आणि गरम पडते.
थकवा आणि चक्कर:- प्रचंड अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे किंवा शुद्ध हरपणे
डोकेदुखी आणि मळमळ :- तीव्र डोकेदुखी होणे, उलट्या होणे किंवा मळमळणे
स्नायूंचे पेटके: हातापायांच्या स्नायूंमध्ये तीव्र कळा येणे.
वाढलेले तपमान :- शरीराचे तापमान खूप वाढणे.
उपचार :-
शरीराचे तपमान कमी करावे
बाधित व्यक्तीला त्वरित सावलीत किंवा थंड हवा असेल अशा ठिकाणी न्यावे. शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात किंवा ओल्या कपड्याने शरीर पुसून घ्यावे.
शक्य असल्यास थंड पाण्याने आंघोळ करावी.
हायड्रेशन
तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे.
ओ.आर.एस (ORS), लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी किंवा लस्सी यांसारखे पेय प्यावे.
उन्हापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी खालील गोष्टींचे पालन करावे.
दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
पांढरे, सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला, किंवा छत्रीचा वापर करा.
आपली बाहेरील कामे सकाळी 10 च्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर करा.
टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी, कोशिंबीर इ. उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे व भाज्या खा.
उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळा.
पुरेसे पाणी प्या. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा..
लहान मुले, गरोदर माता, आणि वृद्ध नागरिक संवेदनशील असल्याने त्यांची जास्त काळजी घ्या.
चप्पल न घालता / अनवाणी उन्हात चालणे टाळा.
लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आत ठेवून गाडी बंद करणे टाळा.
सामुहिक मेळावा / क्रीडा कार्यक्रम या ठिकाणी पाण्याची सोय असेल, थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क नसेल याची खबरदारी घ्या.
आपल्या दैनंदिन जीवन शैलीत साधे सोपे, छोटे बदल करून नागरिकांनी काही आवश्यक गोष्टींचे पालन करावे आणि उष्माघात संदर्भात लक्षणे आढळून आल्यास आपल्या जवळच्या महानगरपालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.


