काही दिवसांमध्ये सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन व नौपाडा परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे व साईडपट्टीची कामे काल रात्री सुरू करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी कामाची पाहणी केली. तसेच काही सूचना केल्या.
ठाणे शहरातील विविध भागांतून दररोज साडेसहा ते सात लाख नागरिक रेल्वे स्टेशनवर येतात. या नागरिकांकडून स्टेशन परिसर, नौपाडा परिसरातून ये-जा केली जाते. आगामी पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार काल मध्यरात्रीनंतर ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, दादा पाटीलवाडी, ब्राह्रण सोसायटी, भक्ति मंदिर, हरिनिवास परिसरात रस्त्यावरील किरकोळ खड्डे दुरुस्त करण्यात आले. तसेच साईडपट्टीची कामे पूर्ण करण्यात आली. या कामांवेळी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी उपस्थित राहून कामांची पाहणी केली.


