सावरोली तलावाचे झाले डबके पाणवनस्पतींचा गुरांच्याही जीवाला धोका

शहापूर – सोगाव परिसरातील सावरोली (सो) ग्रामपंचायत क्षेत्रातील एकमेव जलसाठा असलेल्या दीडशे वर्षे जुन्या तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याचा फटका नागरिकांसह पाळीव गुरांनाही बसत आहे. कधीकाळी नयनरम्य असलेल्या या तलावाच्या स्वच्छता व सुशोभीकरणाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या सुंदर तलावाला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सावरोली (सो) या सुमारे ८०० लोकवस्तीच्या गावाशेजारी सुमारे १५० वर्षे जुना तलाव असून याच तलावाशेजारी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. तलावाचे पाणी कपडे धुण्यासाठी, गुरांना पिण्यासाठी, बांधकामांसाठी वापरले जात असे. मात्र मागील दोन वर्षांपासून कुठल्यातरी ठेकेदाराकडून या तलावात पाणवनस्पती टाकण्यात आल्याने पाणी दूषित झाले आहे. आताया पाणवनस्पतीचे जाळे इतके दाट झाले आहे की पाण्याचा संपूर्ण पृष्ठभाग या वनस्पतीने व्यापला आहे. पाणवनस्पतींमुळे हे पाणी कपडे धुण्यायोग्य राहिलेले नाही. तसेच या पाणवनस्पतींमध्ये पाणी पिण्यासाठी येणारी गुरे अडकून पडत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागच्या वर्षी दुभत्या म्हशी या जाळ्यात अडकून पडल्यानंतर ग्रामपंचायतकडून काही प्रमाणात पाणवनस्पती काढण्यात आल्या होत्या. याच तलावाशेजारील विहिरीचे पाणीही यामुळे दूषित झाले आहे. तातडीने या पाणवनस्पती तलावातून काढून टाकण्याचे काम हाती घ्यावे व पावसाळा सुरु होण्यापूर्वीच तलाव स्वच्छ करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान सदरचा तलाव गाळमुक्त करणे, पाणवनस्पती काढून टाकणे, सुशोभीकरण करणे इत्यादी बाबींना प्राधान्य दिल्यास एक चांगले पर्यटनस्थळ विकसित होऊ शकते. परंतु सावरोली (सो ) ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करत असल्याची प्रतिक्रिया येथील तरुणांनी दैनिक ठाणे वार्ताशी बोलताना दिली.

Scroll to Top