सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीमांव्दारे साफसफाई

नवी मुंबई – शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देतांना प्राधान्याने वर्दळीच्या जागा तसेच दुर्लक्षित जागा यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात असून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनपासून १२ जूनपर्यंत विशेष स्वच्छता मोहीमांचे आयोजन नमुंमपा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.

या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्टेशन, सायन पनवेल हायवे, झोपटपट्टी, गाव/गावठाण क्षेत्र, तलाव व खाडी किनारे अशा विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीमा घेण्यास सुरुवात झाली आहे. आता घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू करण्यात आले असून याबाबत व्यापक जनजागृतीही करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने शहरातून जाणारा मुख्य सायन पनवेल महामार्ग याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत दि. 06 ते 10 जून या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यामध्ये सायन पनवेल महामार्गावरील कोकण भवन सर्कल ते उरण फाटा, उरण फाटा ते एल. पी. जंक्शन, एल. पी. जंक्शन ते शिरवणे फाटा, जुईनगर स्टेशन ते सानपाडा अंडर पास व वाशी येथे विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. 

यावेळी बेलापूर, नेरूळ, तुर्भे व वाशी विभाग कार्यालयातील नमुंमपा अधिकारी व कर्मचारी तसेच स्वच्छता दूत यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात येणा-या सायन पनवेल महामार्गाच्या भागाची स्वच्छता केली. या मोहीमेत 148 स्वच्छता दूतांनी सक्रीय सहभाग घेतला. येथून 2.5 टन केरकचरा व माती जमा करण्यात आली. त्याचप्रमाणे स्वच्छता झाल्यानंतर या मार्गावर फॉगर मशिन तसेच यांत्रिकी वाहनाद्वारे विशेष साफसफाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांच्या नियंत्रणानुसार,  घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून संबधित स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्यासह 148 स्वच्छताकर्मीनी सायन पनवेल महामार्ग स्वच्छ केला. स्वच्छता ही नियमित करण्याची बाब असल्याने महामार्गावरील स्वच्छता मोहीमा नियमितपणे घेण्यात याव्यात अशा सूचना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या असून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Scroll to Top