इगतपुरी – इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेला मोठे संघटनात्मक बळ मिळाले असून, अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांनी मनसे रेल्वे कामगार सेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामुळे इगतपुरी विभागातील रेल्वे कामगारांमध्ये मनसेबाबत वाढता विश्वास आणि संघटनेची मजबूत होत चाललेली पकड अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तसेच सचिव अमित ठाकरे यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांनी संघटनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे इगतपुरी रेल्वे विभागात मनसेची ताकद अधिक वाढल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी जितेंद्र पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणे आणि प्रशासनापर्यंत त्यांच्या मागण्या प्रभावीपणे पोहोचविणे हेच संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कामगारांच्या विश्वासामुळे संघटना दिवसेंदिवस अधिक सक्षम होत असून, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या न्याय्य हक्कासाठी मनसे रेल्वे कामगार सेना कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये रेल्वे शिक्षण विभागाचे सचिव विजय खोरे, मुंबई विभाग अध्यक्ष प्रथमेश म्हात्रे, कार्याध्यक्ष दीपक साळवी, संगठन सचिव दिलीप सोळंके, महासचिव विकास साबळे, सहसचिव हरीशकुमार ठाकूर, इगतपुरी गट अध्यक्ष धनंजय पाटील, मीडिया सेल प्रमुख राजू शिंदे, केंद्रीय सचिव गुरुदत्त पाटील तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात श्विवेक सिंग, संजीव सावंत, दिलीप सोळंके, श्रीराम अग्रवाल, गुरुदत्त पाटील, विनोद गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कामगारांचे स्वागत केले. या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत भविष्यात कामगारांच्या प्रश्नांवर अधिक ताकदीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. इगतपुरीसारख्या महत्त्वाच्या रेल्वे विभागात झालेला हा सामूहिक प्रवेश मनसे रेल्वे कामगार सेनेसाठी मोठे यश मानले जात आहे. वाढत्या सदस्यसंख्येमुळे संघटनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यास नवे बळ मिळणार आहे. कामगारांचा वाढता प्रतिसाद आणि संघटनेवरील विश्वास लक्षात घेता, आगामी काळात राज्यातील इतर रेल्वे विभागांमध्येही अशाच प्रकारे संघटन विस्ताराला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


