पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील अंगणवाडीत अडीच वर्षांच्या मुलीला रडत असल्याच्या रागातून आईने आंगणवाडीच्या प्रवेशव्दारावरच लाथ मारल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. संबंधित आईची चौकशी करण्यात आली असून बालिकेची वैद्यकीय तपासणी करून तिला आईसह बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने समाजमाध्यमांवर चित्रफीतीव्दारे आपली चूक मान्य करत माफी मागितली आहे.
ही घटना गुरूवारच्या सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पनवेल तालुक्यातील नांदगाव येथील अंगणवाडीत घडली. अडीच वर्षांच्या मुलीला प्रथमच अंगणवाडीत आणल्यानंतर ती सतत रडत होती. तिचे रडणे पाहून वर्गातील इतर मुलेही रडू लागल्याने आईचा संयम सुटला. मुलीला बाहेर नेऊन शांत करण्याऐवजी तिने रागाच्या भरात तिच्या पोटच्या मुलीला लाथ मारल्याचे चित्रफीतीमध्ये दिसून आले. घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित महिलेवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. त्याचबरोबर अंगणवाडीतील परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबतही काहींनी प्रश्न उपस्थित केले.
भाजपच्या आंदोलनावर प्रकल्पग्रस्त नाराज; सत्ता असतानाही विमानतळाचे नामकरण न झाल्याने संताप
चित्रफीतीची दखल घेत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना पाठवून संबंधित बालिकेच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकरण बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले आहे. समितीसमोर आई आणि मुलीला हजर करण्यात आले. समितीच्या मान्यतेनंतर आईच्या स्वाधिन बालिकेला करण्यात आले. पोलीस सोमवारी या प्रकरणाचा अहवाल समितीसमोर मांडणार असल्याचे पोलीस अधिकारी ठाकरे यांनी सांगीतले. त्यानंतर पुढील कार्यवाही समितीच्या अहवालानुसार केली जाणार आहे. संबंधित महिलेने समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या चित्रफीतीमध्ये आपल्या कृतीबद्दल खेद व्यक्त करत रागाच्या भरात ही चूक झाल्याचे सांगितले आणि सर्वांची जाहीर माफी मागितली. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून लहान मुलांशी संवेदनशीलतेने वागण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


