विसर्जित पीओपी मूर्तीपासून अभिनव स्टडी टेबलची निर्मिती -नवी मुंबई महानगरपालिकेचे पर्यावरणपूरक यशस्वी पाऊल

श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने पीओपी मूर्ती विसर्जनासाठी 146 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली होती. या कृत्रिम तलावात विसर्जित झालेल्या साधारणतः 8 हजार मूर्ती संकलीत करुन त्यांना निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आले होते.

या मूर्तीवर शास्त्रोक्त पध्दतीने पुनर्प्रक्रिया करण्याकरिता आयआयटी मुंबई, आयसीटी मुंबई तसेच या क्षेत्रात कार्य करणा-या विविध स्वयंसेवी संस्था यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळण्याकरिता संपर्क साधण्यात आला होता.महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत होते. या अनुषंगाने हेन्केन इंडिया प्रायवेट लिमिटेड व बिच प्लिझ इंडिया लिमिटेड यांच्या सिएसआर निधीमधून रोटरी क्लब नवी मुंबई यांच्या सहकार्याने 700 विसर्जित मूर्तीवर प्रक्रिया करुन साधारणतः 1500 कि.ग्रॅ. पीओपी पासून 760 स्टडी टेबल तयार करण्यात आले. या स्टडी टेबलचे वितरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा माध्यमिक शाळा क्रमांक 104, आंबेडकर नगर रबाळे येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

पीओपीवर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याच्या पुढील टप्प्यात मूर्तीच्या पीओपीवर प्रक्रिया करून त्यापासून पुनर्वापर करण्यायोग्य पीओपी तयार करुन त्याचा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधिन आहे. या संदर्भात इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्निकल अर्थात आयसीटी, मुंबई या नामांकित संस्थेशी विचारविनिमय सुरु आहे. याबाबत संबधित संस्थेचे शास्त्रज्ञ तसेच मूर्तीकार संघटनेचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठकी आयोजित करून याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. संस्थेमार्फत याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेमार्फत आवश्यक परवानग्या घेऊन या प्रकल्पाविषयी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यातील व्दितीय क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून नावलौकिक असणा-या नवी मुंबई शहराने निसर्गाच्या प्रत्येक तत्वाच्या अनुषंगाने उत्तम कामगिरी करण्याचे निश्चित करून त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.

Scroll to Top