ठाणे आरटीओच्या माहितीनुसार एकूण 3,32,648 वाहनधारकांनी एचएसआरपीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 3,31,310 वाहनधारकांनी 29 जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतली, तर 2,57,551 वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. अपॉइंटमेंट घेतलेल्या उर्वरित वाहनांवर फिटमेंटची प्रक्रिया सुरू आहे.
राज्य परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार 30 जूनपर्यंत HSRP साठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कारवाई होणार नाही. मात्र, ज्या वाहनधारकांनी अद्याप HSRP साठी नोंदणी किंवा अपॉइंटमेंट घेतलेली नाही, अशा वाहनांवर आजपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उप परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. ठाणे RTO ने वाहनधारकांना विनंती केली आहे की, दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी त्वरित HSRP बसवून घ्यावी. उच्च सुरक्षा नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित व अचूक होत असून, चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासही मोठी मदत होते.
त्यामुळे ही केवळ कायदेशीर अट नसून वाहनांच्या सुरक्षिततेसाठीही महत्त्वाचे पाऊल असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.


