महापौर सुजाता पाटील यांनी विविध ठिकाणी भेटी देत केली पावसाळी स्थितीची प्रत्यक्ष पाहणी

संततधार पावसाच्या अनुषंगाने नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी बेलापूरपासून दिघ्यापर्यंत महापालिका क्षेत्रात विविध विभागांतील सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणी भेटी देऊन तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शहर अभियंता आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुसळधार पाऊस सुरू असल्याने महापालिका क्षेत्रातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन मदतकार्य व्यवस्था करण्यात आली होती तसेच पाणी उपसा पंपांचीही व्यवस्था करण्यात आली होती. अशा भरतीच्या काळात पाणी साचलेल्या सखल भागातील बेलापूर ते दिघा येथील विविध ठिकाणांना भेटी देत महापौर सुजाता पाटील यांनी तेथील स्थितीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व अशा ठिकाणी पाणी उपसा पंपांची संख्या वाढवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी अधिकारी, कर्मचारी दक्षतेने कार्यरत राहतील असे सांगून नागरिकांना आश्वस्त केले.

ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचते, त्या ठिकाणांवर तातडीने रस्त्याच्या कडेचे चर खोदून व वॉटर एन्ट्री मोकळ्या करून पाणी वाहते करण्याची व्यवस्था करावी असे निर्देशित देण्यात आले. त्याचप्रमाणे नाल्यांमध्ये प्लॅस्टिक व इतर कचरा अडकून ते तुंबू नयेत या दृष्टीनेही दक्षता घेण्याची व अडकलेला कचरा नियमित साफ करण्याची सूचना करण्यात आली. मोरबे धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे याची चिंता व्यक्त करीत आपण सारे जण पावसाची आतुरतेने वाट बघत होतो. मात्र आता पाऊस आल्यानंतर मोरबेची पातळी वाढत आहे याबद्दल समाधान व्यक्त करतानाच पावसामुळे पाणी साचून नवी मुंबईतील नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात असून महापालिकेमार्फत क्षेत्रीय स्तरावर कशा पध्दतीने मदतकार्य सुरू आहे याची पाहणी करण्यासाठी आज ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या असल्याचे सांगत महापौर सुजाता पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी महापालिका दक्ष असल्याचे सांगितले आहे.

Scroll to Top