अंगणवाडी सेविकांच्या समस्यांसाठी उपनगराध्यक्षा नम्रता तेलवणे सरसावल्या

मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. नम्रता नितीन तेलवणे यांनी मुरबाड शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी नगरपंचायतीच्या दालनात संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत अंगणवाडींच्या पायाभूत सुविधांपासून बालकांच्या पोषण आहारापर्यंत अनेक गंभीर प्रश्न मांडण्यात आले.

मुरबाड शहरात एकूण २१ अंगणवाड्या कार्यरत असून त्यापैकी केवळ ४ अंगणवाड्यांना स्वतःची इमारत आहे. उर्वरित अंगणवाड्या भाड्याच्या जागेत चालवल्या जात असून त्या जागांचे भाडे शासनाकडून वेळेवर मिळत नसल्याने सेविकांना आपल्या तुटपुंज्या मानधनातूनच भाडे भरावे लागत असल्याची गंभीर बाब यावेळी समोर आली. याशिवाय, अंगणवाडीतील लहान बालकांना दिला जाणारा सकस आहार अपुरा असून त्याचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार सेविकांनी केली. अंबरनाथ महिला व बालविकास विभागाकडून पुरेशा सुविधा मिळत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासन इतर विविध योजनांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असताना बालकांच्या पोषण आहारासह मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Scroll to Top