ठाणे काँग्रेसच्या एसआयआर अभियान प्रशिक्षणाला कार्यकर्त्यांची विक्रमी उपस्थिती

आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने SIR अभियानांतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात प्रशिक्षक डॉ. निमिष साने
यांनी अभियानाची उद्दिष्टे, बूथस्तरावरील नियोजन, मतदारांशी प्रभावी संवाद, संघटनात्मक शिस्त आणि आगामी कार्यपद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत अभियानाच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. शिबिरात BLA-2, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सदस्य, विभागीय समन्वयक यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Scroll to Top