अंबरनाथ प्राचीन कालीन शिवमंदिर परिसरातील रिलायन्स, जुने अंबरनाथ गाव, पालेगाव या नवीन विस्तारित क्षेत्रात अनेक मोठे गृहसंकुल पार्क उभारले जात आहेत. शुक्रवारी, शनिवारी पासून पावसाची जोरदार मुसळधार सुरू आहे. रस्ते जलमय झाले तर अनेक सोसायटी, घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने यावर्षीही नाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मागील वर्षीच्या आंदोलनानंतरही वर्षभरात पालिकेने काहीच उपायोजना केली नाही. त्यामुळे पालिकेला आता पुन्हा जाब विचारण्यासाठी युवासेनेचे निशाण पाटील यांनी पालिकेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. अंबरनाथ पूर्व येथील शिवमंदिर ते रिलायन्स वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शनिवारी झालेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने
वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरच पाणी साचल्याने पालिकेच्या कामाच्या दर्जासह नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या पुलावर पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी निशाण पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. याच समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या वर्षी त्यांनी पाण्यात बसून आंदोलन केले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत पाण्याचा निचरा होण्यासाठी आउटलेटची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र वर्षभर उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप त्यांनी केला. दरवर्षी प्रत्येक पावसाळ्यात येथील रस्त्यांवर कंबरभर पाणी साचून या जलमय अवस्थेत जीव धोक्यात घालून वाहनचालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. अपघाताचा धोका वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा पाण्यात बसून पुन्हा आंदोलन करू असा इशाराही निशाण पाटील यांनी दिला आहे.


