संपूर्ण महिनाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जुलै महिन्याच्या २, ३ आणि ४ तारखेपासून मुरबाड, कल्याण व बदलापूर परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सलग दोन तिन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
मुरबाड – कल्याण मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सततच्या पावसामुळे उल्हास नदीनेही रौद्ररूप धारण केले असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पूरस्थिती असलेल्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तहसीलदार अभिजीत देशमुख, मुख्याधिकारी मनोज म्हसे तसेच पोलीस अधिकारी सचिन हदुलकर यांनी आपापली यंत्रणा सज्ज ठेवली असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत कार्य करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड मार्गावरील धानिवली पुलावरील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मोठा तडा गेल्याचे समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग बनवत असताना उत्तम तंत्रज्ञान असूनही ही अवस्था आहे. तर प्रत्यक्ष कामातील हलगर्जीपणा, निकृष्ट मटेरियल वापरल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.


