मागील ४ ते ५ दिवस नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यृष्टी झाली असून ताशी ६० ते ७०
कि. मी. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. महापालिकेची मदत यंत्रणा या काळात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अथक कार्यरत होती. आयुक्त सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास व विभागीय कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोहचून
निराकरणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा दिघा ते बेलापूर असा पाहणी दौरा करत क्षेत्रीय स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व पाणी साचलेल्या ठिकाणांवरील कारणे जाणून घेत उपाययोजनांच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. त्यामध्ये महापे शिळफाटा मार्गावर एल अॅन्ड टी जवळील उड्डाणपुलाखालील रस्त्याखालून दक्षिणोत्तर जाणारा नाला पूर्ण बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यावर तांत्रिक उपाययोजना करीत त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल ड्रिलिंग मशिन या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा उपयोग करुन नाले सफाईचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामाची पाहणी करीत सध्या पावसाने काहीशी उघडीप दिली असल्याने हे काम जलदा गतीने हे काम पूर्ण करावे असे निर्देशा आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे एमआयडीसीने रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या ड्रेनेज लाईन वर आणखी एक विटांचे बांधकाम केले त्यामुळे ड्रेनेज लाईन खालच्या पातळीवरू आल्या व पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे आणि त्या ठिकाणी पाणी साचत आहे. ही बाब लक्षात घेऊन ड्रेनेजच्या वर केलेले बांधकाम तोडून सदर ड्रेनेज लाईन खुल्या करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले व या कामास त्वरित सुरुवातही करण्यात आली. अशाच प्रकारे ऐरोली येथे टी जंक्शन हा भाग अतिसखल असल्याने या भागात साचणारे पाणी निचरा होण्यासाठी त्या ठिकाणी पंपांची व्यवस्था वाढविण्याचे तसेच ड्रेन होलची संख्या व आकारमान वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच कुठेही मॅनहोलवर झाकणे असतील याची संपूर्ण खातरजमा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले व यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. एमआयडीसी क्षेत्रासह ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग व अंतर्गत मुख्यमार्ग अशा सर्वच क्षेत्राची पाहणी करताना ६० ते ७० कि.मी. प्रती तास वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली असल्याचे लक्षात घेऊन या झाडाच्या फांदयांची कटाई करुन ती हलविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.


