शनिवार पासून भिवंडी शहर व ग्रामीण भागात बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून, मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावरील मानकोली नाका या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. या मार्गावर अवजड वाहनांची गोदाम पट्टयात वाहतूक होत असताना या मार्गावर मानकोली अंजूर व दापोडे अंजूरफाटा या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने येथील वाहतूक मंदावली आहे. येथे नारपोली वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात असून स्वतः वाहतूक पोलीस देखील पाण्यात उतरून ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु रस्त्यावरील पाणी व खड्ड्यांमुळे येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अडचणी येत असल्याची माहिती नारपोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली असून, काम असेल तरच बाहेर निघा अन्यथा घरातच राहण्याचे आव्हान देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


