बांधकाम व्यावसायिकाने गुरचरण जागेवरील अडवलेला रस्ता खासदारांनी केला खुला

कोनगाव येथील गुरचरण जागेवर अतिक्रमण करत नागरिकांसाठी असलेला पारंपारिक रस्ता बांधकाम व्यावसायिकाने पत्रा मारून बंद केला होता. याबाबतच्या तक्रारी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्याकडे आल्या असता बुधवारी खासदार बाळ्या मामा यांनी घटनास्थळी धाव घेत येथील गुरचरण जागेवरील व्यवसायिकाने अडवलेला रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खुला करून दिला.

यावेळी तहसीलदार अभिजित खोले, गट विकास अधिकारी सुधाकर खामकर, कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, ग्राम पंचायतीच्या सरपंच रेखा पाटील, माजी सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांच्यासह स्थानिक नागरिक, महिला व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोनगाव येथील मेगास सिटी या बांधकाम व्यावसायिकाने गुरचरण जागेवर अतिक्रमण करत नागरिकांचा पारंपरिक रस्ता येथील नागरिकांसाठी बंद केला होता. याच भागात असलेल्या तलाव व विहिरीवर येथील आदिवासी महिला व नागरिकांना पाणी भरण्यासाठी व्यवसायिकाकडून देखील मज्जाव करण्यात येत होता. याबाबतच्या तक्रारी खासदार बाळ्या मामा यांच्याकडे आल्या असता या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे निर्देश खासदार म्हात्रे यांनी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना दिले. यावेळी तहसीलदार यांनी तत्काळ रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खुला करत पत्र्यांचे अतिक्रमण काढून टाकले.

या बांधकाम व्यावसायिकाने शासकीय जागेवर अतिक्रमण करून नागरिकांचा रस्ता अडवला होता, आज आम्ही हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. याबाबत २०१३ पासून मी पाठपुरावा केला आहे. आता पुन्हा जर व्यवसायिकने रस्ता अडवला तर अतिक्रमणांबरोबरच अनधिकृत बांधकाम देखील तोडून टाकू अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

Scroll to Top