भिवंडीत नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास विरोध केल्याने शहरात चार दिवसांपासून कचरा पडून

शनिवार (११) रोजी शहरातील चाविंद्रा रामनगर येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास आलेल्या डंपरच्या धडकेत तीन वर्षीय शनाया अब्दुल हक या चिमुरडीचा हकनाक बळी गेला या घटनेनंतर स्थानिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी येथील पालिका कर्मचाऱ्यांची कॅबिन जाळून डंपर जाळला होता. त्यानंतर स्थानिकांनी येथील डंपिंग ग्राउंड ला कडाडून विरोध केल्याने मागील चार दिवसांपासून शहरातील कचरा डंपिंग ग्राउंड वर टाकला जात नसल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग लागले असून त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

मागील तीन दिवस शहरातील कचरा घंटागाड्या मधून उचलून नेल्यानंतर टाकायचा कोठे हा प्रश्न प्रशासना समोर उभा राहिला आहे. ज्यामुळे रस्त्याकडेला उड्डाणपुला खाली कचऱ्याचे ढीग लागले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे. यामुळे अशा रस्त्यां वरून जाताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. सध्या पालिका प्रशासनाकडून प्रभाग समिती निहाय कचरा संकलन केंद्र असणाऱ्या ठिकाणी कचरा जमा केला जात आहे. परंतु येथील जागेची क्षमता नसल्याने येथेही कचरा पडून ढीग लागले आहेत. येथील अपघातात जीव गमावणाऱ्या चिमुकलीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी. या ठिकाणी कचरा घेऊन येणाऱ्या नादुरुस्त वाहन तत्काळ बंद करावी, प्रत्येक वाहनावर चक्क सोबत क्लिनर असावा येथील डंपिंग ग्राउंडची क्षमता संपली असल्याने ते तत्काळ बंद करावे अशा मागण्या स्थानिक नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी पालिका प्रशासना समोर मंगळवारी झालेल्या बैठकीत केल्या आहेत. याबाबत पालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत या बाबत माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता आयुक्त अनमोल सागर, उपायुक्त मुख्यालय विक्रम दराडे, सार्वजनिक आरोग्य विभाग प्रमुख फैजल तातली यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.

Scroll to Top