कामतघर परिसरातील वार्ड क्रमांक २१ व २३ या परिसरातील काटेकर नगर, न्यू काटेकर नगर, गजानन संकुल, मैत्री आयकॉन, शिवनगर या भागातील निवासी संकुलासाठी मागील आठवड्यापासून पाणी पुरवठ्याची पाईप लाईन नालेसफाईच्या कामावेळी जाणीवपूर्वक उखडल्याने येथील पाणीपुरवठा मागील सहा दिवसांपासून बंद झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी संकटाचा सामना करावा लागला होता. या घटनेचे गांभीर्य तपासत स्थानिक नगरसेवक शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी पुढाकार घेत तातडीने या परिसरासाठी स्वतंत्र नवी आठ इंची पाईपलाईन काम सुरू केले असून या कामाचा शुभारंभभूमिपूजन मनोज काटेकर यांच्या उपस्थिती मध्ये नगरसेविका वंदना काटेकर यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक संदीप भोईर, युवासेना पश्चिम विधानसभा प्रमुख तेजस काटेकर यांसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. येथील नागरिकांच्या समस्येबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविताच त्यांनी तात्काळ आयुक्त अनमोल सागर यांना या बाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापौर नारायण चौधरी व आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशाने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर, कनिष्ठ अभियंता सर्फराज यांनी तत्काळ या ठिकाणी काम करण्यासाठी पाईप उपलब्ध करून दिल्याने हे काम होत असल्याचे मनोज काटेकर यांनी स्पष्ट केले. येथील काही राजकीय विरोधकांनी जाणीव पूर्वक पाईप लाईन तोडून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.पण आम्ही सत्याने वागणारे असल्याने चांगल्या कामासाठी जनता आमच्या सोबत आहे असे प्रतिपादन शिवसेना गटनेता मनोज काटेकर यांनी केले.


