अंबरनाथमध्ये अनधिकृत होर्डिंग्जवर पालिकेची धडक कारवाई

अनधिकृत होर्डिंगविरोधी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार अंबरनाथ शहरात विनापरवानगी उभारण्यात आलेल्या अनाधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर नगरपालिकेने मंगळवारी सकाळपासून पाच वाजेपर्यंत धडक कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपासून अंबरनाथ नगरपालिकेने एक जाहीर प्रोटीन्स काढून या सर्व अनाधिकृत होर्डिंग धारकांना ते हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने अखेर पालिकेच्या या धडक कारवाईमुळे अनधिकृतपणे बॅनर्स लावणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.

एकीकडे अंबरनाथ शहराच्या सुशोभीकरणाचे विषय आणायचे आणि दुसरीकडे राजकीय पक्षांकडूनच सर्वाधिक शहराचे विद्रुपीकरण करण्यात आघाडीवर असलेल्या राजकीय पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी आघाडीवर असल्याचे या कारवाईदरम्यान पुन्हा समोर आले आहे. सर्वसामान्य माणूस इतके महागडे बॅनर्स लावू शकत नाही. अशी चर्चा शहरात रंगतदार झाली आहे. शहरातील मुख्य राज्यमार्ग, प्रमुख चौक, आणि गल्लीबोळात सुद्धा अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात स्पर्धा होत असताना ऐन पावसाळ्यात अंबरनाथ नगरपालिकेने बॅनर मुक्त अंबरनाथ मोहीम सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार २१ जुलै रोजी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Scroll to Top