जंतरमंतरहून माघारी फिरण्याचं तरुणाईला आवाहन !
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर इतरही दोन मागण्या मान्य केल्याने कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारसोबत पार पडलेल्या तिसऱ्या बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. केंद्र सरकारकडून जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास तसेच, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरभाई देण्याचे मान्य केल्याचे दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नीट पेपरफुटीप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीकडून गेल्या ३६ दिवसांपासून दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन केले जात होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला समर्थन देत उपोषणाची घोषणा केल्यानंतर याला वेगळी धार चढली. प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणीपुढे अखेर सरकार झुकलं आणि आज प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँक्रोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत तिसरी बैठक पार पडली. या बैठीत सीजेपीकडून इतर दोन मागण्याही ठेवण्यात आल्या. या मागण्या सरकारने मान्य केल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले.
आंदोलनादरम्यान केवळ दिल्लीतच नव्हे तर भाजपाशासित राज्यात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सीजेपीने केली होती. सरकारने ही मागणी मान्य केली आहे. एफआयआरच्या कॉपी सीजेपीला देण्यासही सरकारने तयारी दर्शवली आहे. शिवाय भविष्यात देखील कारवाई केली जाणार नाही, असे सरकारने आश्वस्त केले आहे, अशी माहिती सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिले.


