शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार नीट व टीईटी परीक्षा पेपर फुटीमुळे चव्हाट्यावर आला आहे. त्याविरोधात देशभरातून आक्रोश व्यक्त केला जात असताना भिवंडीत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांसह तहसीलदार कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत निदर्शने केली. शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार असताना आजही आदिवासी कातकरी स्थलांतरित शेतमजूर शिक्षणा पासून वंचित आहेत. शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती संख्या वाढत असतानाच अनेक परीक्षांचे पेपर फुटत आहेत. त्यासाठी नीट सह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये पूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व गैरव्यवहार मुक्त व्हाव्यात, प्रत्येक विद्यार्थ्याला बारावी पर्यंत शिक्षणाची स्थानिक सुविधा मिळावी, आदिवासी व दुर्गम भागात उच्च माध्यमिक शाळांची व्यवस्था करावी अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयास दिले आहे.


