कवीने वर्तमानाकडे त्रयस्थपणे बघत सर्वसमावेशकता हा स्वभावधर्म जपला पाहिजे आणि प्रामाणिकपणे आत्म्याचा आवाज मांडला पाहिजे अशा शब्दात सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे यांनी श्रोत्यांशी दिलखुलास संवाद साधत कवी साहेबराव ठाणगे यांची कविता व ललित लेखन हे मातीशी नाते सांगणारे असल्यामुळे ते अस्सल आहे अशा शब्दात कौतुक केले.
ठाणे येथील रोटरी सेंटर सभागृहात आषाढी एकादशीचे औचित्य साधून कवी, लेखक साहेबराव ठाणगे यांच्या ‘सोयरे सकळ’ पुस्तकाची तिसरी आवृत्ती तसेच त्यांच्या समग्र कवितांचा वेध घेणारे नवेकोरे पुस्तक ‘कविता रानातल्या, मनातल्या’ आणि त्यांच्या समग्र ललित साहित्याचा वेध घेणारे नवे पुस्तक ‘सदानंदाचं चांगभलं’ अशा पुस्तक ‘कविता – रानातल्या, मनातल्या’ आणि त्यांच्या समग्र ललित साहित्याचा वेध घेणारे नवे पुस्तक ‘सदानंदाचं चांगभलं’ अशा अष्टगंध प्रकाशित तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी कवी साहेबराव ठाणगे, साहित्यिक सतीश सोळांकुरकर, कवी दुर्गेश सोनार, अष्टगंधचे प्रकाशक संजय शिंदे मंचावर उपस्थित होते.
साहेबरावांच्या शब्दांमधल्या सर्वांना हव्याहव्याशा वाटणा-या गावाचा चेहरा आता काळानुरूप बदलत असून त्या स्थित्यंतराचे चित्रण ही कविता प्रभावीपणे करते त्यामुळे ती आपली वाटते असे सांगत रामदास फुटाणे यांनी व्यवस्थेविरोधातील उद्रेकाच्या परिस्थितीत कवीची जबाबदारी मोठी असल्याचे मत मांडले. आज मराठी टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून कवी गेल्यानंतर त्याची कविता राहिली, वाचली गेली तरच ख-या अर्थाने त्यानंतर त्याचे जीवन सुरू होते असा वेगळा विचार त्यांनी मांडला.
साहेबराव ठाणगे यांच्या समग्र ललित साहित्याचे परिशीलन करून ‘सदानंदाचं चांगभलं’ या पुस्तकाचे संपादन करणारे साहित्यिक सतीश सोळांकुरकर यांनी साहेबरावांच्या लेखनाची वैशिष्ट्ये व सूक्ष्म तपशील टिपले.


