धोकादायक इमारतीविरुद्ध महानगरपालिकेची तोडक कारवाई; उत्तन नाका येथील ‘सागर दर्शन’ इमारतीच्या तोडक कारवाईस सुरुवात

२ ऑगस्ट २०२६ रोजी मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद
अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत प्रभाग समिती क्रमांक ०१ अंतर्गत उत्तन नाका येथील ‘सागर दर्शन’ या धोकादायक घोषित इमारतीवर तोडक कारवाईस प्रारंभकरण्यात आला.

शहरातील धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवित व वित्तहानीचा धोका निर्माण होऊ नये, तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.

आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र. से.) यांच्या आदेशानुसार व उपायुक्त (अतिक्रमण) स्वप्नील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांनी नियोजनपूर्वक तोडक कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या असून परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत वाहतूक, मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचे योग्य नियोजन करण्यात आले. महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक इमारतींची नियमित पाहणी करण्यात येत असून, तज्ज्ञांच्या अहवालानुसार अत्यंत धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींवर टप्प्याटप्प्याने कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा इमारतींमधील रहिवाशांनी महानगरपालिकेच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त (अतिक्रमण) स्वप्नील सावंत, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग समिती क्रमांक ०१ सहाय्यक आयुक्त दिपाली पवार तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Scroll to Top