कोपरीत खड्ड्यांवर मॅस्टिकचं मलम!

दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महापालिकेची तातडीची कारवाई

राज्यात पावसाळ्ळ्यात रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडत असताना, ठाणे महापालिकेने मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत खड्डेमुक्त रस्त्यांची मोहीम वेगाने राबविली आहे. कोपरी परिसरातील बाराबंगला, कोपरी पूल तसेच इतर महत्त्वाच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी मॅस्टिक डांबर या टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पावसाळ्यात धोकादायक ठरू शकणाऱ्या खड्ड्यांची पाहणी करून प्राधान्याने दुरुस्ती केली जात आहे. विशेषतः ज्या मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असते, त्या ठिकाणांवरील खड्डे तातडीने बुजविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच चारचाकी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळत आहे.

मॅस्टिक डांबर हे पारंपरिक डांबराच्या तुलनेत अधिक मजबूत आणि पाण्याचा कमी परिणाम होणारे तंत्रज्ञान मानले जाते. त्यामुळे सततच्या पावसातही खड्डे पुन्हा निर्माण होण्याची शक्यता कमी राहते. यामुळे दुरुस्तीचा दर्जा सुधारण्यासोबतच रस्त्यांचे आयुष्य वाढण्यासही मदत होते.

महापालिकेने शहरातील विविध भागांतील रस्त्यांवरही अशीच दुरुस्ती मोहीम सुरू ठेवली असून, पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित, सुरळीत आणि खड्डेमुक्त प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाच्या परिस्थितीनुसार खड्यांची नोंद घेऊन तत्काळ दुरुस्ती करण्याची कार्यवाही सातत्याने सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात खड्यांमुळे दुचाकी चालवणे धोकादायक झाले होते. कोपरीत महापालिकेने मॅस्टिक डांबराने खड्डे तातडीने बुजवल्याने आता प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. अशीच कारवाई इतर रस्त्यांवरही व्हावी. – स्वप्नील कोळी

Scroll to Top