विणकर सेवा केंद्र, नागपूरद्वारे राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात साजरा

हातमाग विणकरांच्या सक्षमीकरणासाठी विविध लाभांचे वितरण

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त (हातमाग) कार्यालयांतर्गत विणकर सेवा केंद्र, नागपूर यांच्या वतीने 12 वा राष्ट्रीय हातमाग दिन आज कॉमन वर्कशेड, धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, वरोडा, तालुका कळमेश्वर, नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राजीव पोतदार, तर विशेष अतिथी म्हणून धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे संचालक सुधीर दिवे, वस्त्रोद्योग उद्योजिका निधी गांधी उपस्थित होते.

आमदार राजीव पोतदार यांनी विणकर सेवा केंद्र आणि धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या हातमाग क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे उद्घाटन आगामी नवरात्रोत्सवादरम्यान होणार असून या सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विणकर सेवा केंद्र, नागपूरचे उपसंचालक तसेच कार्यालय प्रमुख संदीप पी. ठुबरीकर यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्त्व विशद करत राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमांतर्गत विणकरांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच विणकर सेवा केंद्र, नागपूर यांनी फ्रेम लूम, सोलर लाइटिंग युनिट आणि वर्कशेड वितरणासह क्षेत्रीय स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कार्याचा तसेच स्थानिक विणकरांना प्राप्त झालेल्या राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांचा आढावा त्यांनी सादर केला.

हाय्यक संचालक महादेव पौनिकर यांनी भारतीय हातमाग उद्योगाची समृद्ध परंपरा अधोरेखित करत धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या स्थापनेपासून अंमलबजावणीपर्यंतचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला. या प्रकल्पासाठी विकास आयुक्त (हातमाग), वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या कार्यालयामार्फत 22.50 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक उर्वरित निधी आणि जमीन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे उपलब्ध झाल्याने हा प्रकल्प साकार झाल्याचे त्यांनी सांगितले. समर्थ प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक 30 विणकरांच्या तुकडीस स्वतंत्र हातमाग उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी होऊन विणकरांना प्रत्यक्ष कामाचा वैयक्तिक अनुभव मिळेल, असे त्यांनी सांगितले. हातमागाशी संबंधित पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत असलेल्या आणि नियमित उत्पन्नाचे साधन नसलेल्या व्यक्तींना पूरक कामांद्वारे दररोज सुमारे 150 रुपये विद्यावेतन मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वस्त्रोद्योग उद्योजिका निधी गांधी यांनी त्यांच्या उद्योगामार्फत दरवर्षी सुमारे 3,000 मीटर हातमाग कापडाची खरेदी केली जात असून धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे उत्पादन सुरू झाल्यानंतर ही खरेदी 10,000 मीटरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. यामुळे हातमाग विणकरांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Scroll to Top