शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली असून रहिवासी वस्ती व इमारतीतील नागरिक थेट रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याने शहरातील अनेक चौकात व रहिवासी इमारतींच्या समोर कचऱ्याचे ढिग साचल्याचे दिसून येत असतात. या कचऱ्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून दुर्गंधीचे प्रमाण देखील शहरात वाढले आहे.
या कचऱ्याच्या समस्येवर उपाय करण्यासाठी मनपा आयुक्त अनमोल सागर यांनी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य विभागास दिल्या आहेत. यासाठी मुख्य आरोग्य अधिकारी व आरोग्य निरीक्षक यांनी दिवसातून तीन वेळा नेमणूक केलेल्या ठिकाणी पाहणी करणे गरजेचे असून जे नागरिक रस्त्यावर कचरा फेकत असतील अशांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना मंगळवारी दिल्या आहेत. ही कारवाई मनपा प्रशासनाकडून अधिक तीव्र होणार असून जोपर्यंत नागरिक रस्त्यावर कचरा फेकणे बंद करणार नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


