आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त मोहिमेव्दारे स्वच्छता

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानाच्या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या ३० जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आरोग्य विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने संयुक्त मोहीमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या अंतर्गत नवी मुंबई महापालिकेची २६ नागरी आरोग्य केंद्रे यांच्या कार्यक्षेत्रात आरोग्य विभागाचे डास अळीनाशक फवारणी कर्मचारी व मूषक नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्यासमवेत घनकचरा व्यवस्थापनाचे सफाई कर्मचारी यांनी संयुक्तरित्या डासअळीप्रतिबंधात्मक मोहीम तसेच सखोल स्वच्छता मोहीम राबविली.

या मोहीमेमध्ये भंगार साहित्य हटविणे,परिसराची साफसफाई करणे, तुंबलेली गटारे स्वच्छ करणे, अभियांत्रिकी विभागाची आवश्यक किरकोळ दुरूस्ती कामे करणे, डासअळीनाशक फवारणी करणे तसेच उंदीर / घुशी यांचा उपद्रव असलेल्या ठिकाणी औषध टाकून मूषक नियंत्रण करणे अशी कार्यवाही करण्यात आली.

या मोहीमेंतर्गत १,२३,११७ इतक्या मोठ्या प्रमाणात डासउत्पत्ती स्थाने कायमस्वरुपी नष्ट करण्यात आली. यामध्ये टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक चहाचे कप / पाण्याचे कप, पार्सलचे कंटेनर, तुटलेले डबे, थर्माकोल, फुटलेले मडके, फुटलेल्या कुंड्या, कुंड्यांखालील प्लेट, रस्त्यावर अनावश्यक ठेवलेल्या टाक्या व इतर भंगार कायमस्वरुपी नष्ट करण्यात आले.

नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील व घराभोवताली असलेल्या टाकाऊ भंगार साहित्याची योग्य विल्हेवाट लावावी, जेणेकरुन नवी मुंबई शहर हे स्वच्छ, सुंदर व निरोगी राहील असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील व आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Scroll to Top