किन्हवली तालुक्याच्या मागणीसाठी हजारो नागरिकांचा निर्धार मेळावा

६ दशकांपासून प्रलंबित असलेल्या किन्हवली तालुका निर्मिती प्रक्रियेला गती मिळावी व फेब्रुवारी २०२७ नंतर जनगणनेची आकडेवारी उपलब्ध होताच शहापूर तालुक्याचे विभाजन करून नवा किन्हवली तालुका निर्माण करण्यात यावा या मागणीसाठी रविवारी किन्हवलीत नागरिकांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, संस्था, संघटना यांच्यासह हजारो नागरिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहत तालुकानिर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी २१ सदस्यांची समन्वय समिती गठीत करण्यात आली.

१९६६ ला राज्य सरकारला किन्हवलीकरांनी किन्हवली तालुका निर्मितीसाठी दिलेले निवेदन, १९७८ साली तत्कालीन उपमुख्यमंत्री उत्तमराव पाटील यांनी दिलेले सकारात्मक संकेत, २०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाने केलेली चर्चा व सरकारकडून लेखी स्वरूपात मिळालेले सकारात्मक उत्तर, २०१९ साली ठाणे जिल्हा परिषदेने संमत केलेला किन्हवली तालुका निर्मितीचा ठराव, शहापूर महसूल विभागाकडून तहसीलदार भुताळे यांच्या कार्यकाळात शासनाला पाठवला गेलेला अहवाल या पार्श्वभूमीवर किन्हवली तालुका निर्मितीला गती मिळणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र त्यादृष्टीने शासन – प्रशासनाकडून निर्णय होत नसल्याने किन्हवली परिसरातील ९३ गावच्या नागरिकांनी आपल्या मागणीसाठी जोरदार मोहीम सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्यदिनी किन्हवली तालुका निर्मिती समन्वय समितीच्या माध्यमातून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांसह हजारो नागरिकांनी या मेळाव्याला हजेरी लावत तालुका निर्मितीसाठी तनमनधनाने सक्रीय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी २१ सदस्यांसह समितीचे अध्यक्षपदी पत्रकार शामकांत पतंगराव, सचिवपदी पत्रकार संतोष दवणे यांची निवड जाहीर करण्यात आली. तालुकानिर्मितीसाठी शासनाकडून राबवली जाणारी प्रक्रिया व तालुकानिर्मितीसाठी शासनस्तरावर करावा लागणारा पाठपुरावा याबाबत ओबोसी संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, ज्येष्ठ नेते नानासाहेब भेरे, माजी उपसभापती सुभाष हरड, भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष तुकाराम भाकरे, बाजार समिती सभापती नंदकुमार डोहळे, डॉ. तरुलता धानके, संचालक सुनिल धानके, विनायक सापळे, माजी जि.प. सदस्य राजेंद्र विशे, सुनिल भाई धानके, मजूर फेडरेशनचे संचालक निखिल धानके, सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयवंत वाघ, बाळकृष्ण विशे, किरण पतंगराव, बविआ अध्यक्ष योगेश हजारे, प्रहारचे अध्यक्ष वसंत पानसरे, किशोर चन्ने, संगीता ढमके, महेश पतंगराव, गोपाळ वेखंडे, अरुण गगे, विठ्ठल गगे, हनुमंत चौधरी, पुंडलिक रिकामे, अजय चौधरी, काळूराम बांगर, जयकुमार करण, सुरेश विशे, प्रकाश दिनकर, किरण करण आदींनी मार्गदर्शन केले.

Scroll to Top