युवकांनी ठरवलं तर राजकारण बदलू शकते-अनिकेत तटकरे

खालापूर तालुक्यातील कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि ‘आमची माती, आमचा अधिकार, स्थानिकांनाच पहिला रोजगार’ या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात ‘महा एल्गार’ विचारविनिमय सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आमदार तटकरे बोलत होते.

सभेला संबोधित करताना आमदार तटकरे म्हणाले, ‘उद्योगांनी देशाच्या औद्योगिक विकासात मोठे योगदान दिले आहे. मात्र, स्थानिक व्यवस्थापनाकडून चुकीच्या गोष्टी घडत असतील, तर त्यांना वेळीच रोखणे आपले कर्तव्य आहे. परप्रांतियांना मागील दाराने नोकऱ्या देऊन काही वर्षांतच त्यांना स्थानिक नागरिकत्वाचे दाखले दिले जातात, ही पद्धत रोखायला हवी. त्याच वेळी कंपन्यांनी स्थानिक कामगारांवर विश्वास दाखवून त्यांना योग्य रोजगाराच्या संधी दिल्या पाहिजेत.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे, नगराध्यक्ष पुष्पा दगडे, सभापती नमिता घारे, कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, माजी नगराध्यक्ष दत्ता मसूरकर, सुनील पाटील, मुख्य प्रवक्ते भरत भगत, महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंढे, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार अनिकेत तटकरे आणि स्वगृही परतलेले राजेश लाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. येत्या ३ तारखेला होणाऱ्या आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करत सभेची सांगता झाली.

Scroll to Top