चिपळूण तालुक्यातील कासे ग्रामीण परिसरात ‘लालपरी’ धावली

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना खारघरचे शिवसेना उपविभाग प्रमुख बळीराम घाग यांनी सादर केलेल्या एसटी बस सेवेसंदर्भित पत्रानुसार गणपतीपूर्वीच परिवहन मंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊन रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण तालुक्यातील कासे व त्या परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी २४ ऑगस्टपासून ठाणे खोपट बस (सीबीएस) ते कासे या मार्गावर कायमस्वरूपी ‘लालपरी’ एसटी बस सेवा सुरू करण्यात आल्याने कोकणातील ग्रामीण भागातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे खोपट बस स्थानकातून दररोज रात्री ९:३० वाजता कासे साठी बस सुटेल, तर कासे हून रात्री ८ वाजता ठाणे खोपट बस स्थानकासाठी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

चिपळूण तालुक्यातील नायाशी ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार शिवसेना उपविभाग प्रमुख बळीराम सखाराम घाग यांच्यामार्फत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सादर केलेल्या संदर्भीय पत्रानुसार चिपळूण तालुक्यातील कासे व त्या परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे खोपट बस स्थानक ते कासे या मार्गावर एसटी बस सेवा २४ ऑगस्ट पासून सुरू करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिल्यानुसार सेवा सुरू झाल्याने गणपतीपूर्वीच मोठा दिलासा मिळाला आहे.

एसटी बस सेवा मागणीच्या अनुषंगाने ठाणे, भांडुप, कळवा, दिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील कासे मार्गावरील ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी अशी अनेक वर्षापासून मागणी होत होती. दरम्यान त्यानुसार २४ ऑगस्ट पासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कासे, पेडांबे, नायशी शाळा व्हाया कासे, पुरये, वडेरु, कोकरे गाव तसेच हायवे सोडल्यानंतर खेरशेत, कळंबुशी, कोकरे आदी ग्रामीण परिसरातील प्रवाशांना या एसटी बस सेवेचा लाभ मिळणार आहे. चिपळूणनंतर सावर्डे, उसर्डे, खेरशेत नायशी फाटा, वडेरू, कळंबुशी ते कासे या स्टॉपवर बस थांबणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या एसटी बस सेवेचा फायदा होणार आहे.

तसेच सदर बस फेरी प्रवाशांच्या सोयीसाठी संगणकीय आरक्षण सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही वर्षांपासून बंद झालेली सेवा पुन्हा कायमस्वरूपी सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

Scroll to Top