भंगार घोषित रिक्षांविरोधात राज्यव्यापी मोहीम

भंगार घोषित रिक्षांविरोधात राज्यव्यापी मोहीम

५ ऑक्टोबरपर्यंत कारवाईचे आदेश

राज्यातील भंगार (स्क्रॅप) म्हणून घोषित झालेल्या; तसेच नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरोधात ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन विभागाला दिले. अशा रिक्षांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असून त्या कोणत्याही स्थितीत रस्त्यावर दिसू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भंगार झालेल्या वा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयात शुक्रवारी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव; तसेच राज्यभरातील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सरनाईक म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षितता ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असून धोकादायक व नियमबाह्य वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही मुभा दिली जाणार नाही. भंगार म्हणून घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी वा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

तपासणीत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासह आवश्यक ती कठोर प्रशासकीय पावले उचलण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम राबवून ५ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत रिक्षा-टॅक्सी चालक व संघटनांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. काही नियमबाह्य वाहनांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसायाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी केवळ अधिकृत व सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी असावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. परिवहन विभागाच्या या विशेष मोहिमेमुळे राज्यातील बेकायदेशीर आणि भंगार रिक्षांवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Scroll to Top