कासार समाज महिला मंडळाच्या वतीने कोपरखैरणे येथील श्री कालिकादेवी मंदिरात ह.भ.प. प्रज्ञाताई पंडित यांच्या विष्णुसहस्रनाम निरूपणाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी प्रज्ञाताई पंडित यांनी विष्णुसहस्रनामातील नामांचे महत्त्व, त्यामागील आध्यात्मिक आशय तसेच दैनंदिन जीवनात स्तोत्रपठणाचे महत्त्व याविषयी सविस्तर निरूपण केले. विष्णुसहस्रनाम ही केवळ पठणाची परंपरा नसून त्यातून मनःशांती, सकारात्मकता आणि संस्कारांची जडणघडण होण्यास मदत होते, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
वेद, पुराणे आणि भारतीय स्तोत्र परंपरेतील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, स्तोत्रांचे महत्त्व नव्या पिढीला समजावे आणि या समृद्ध परंपरेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी प्रज्ञाताई पंडित सातत्याने कार्यरत आहेत. विविध ठिकाणी स्तोत्रांचे निरूपण, मार्गदर्शन आणि सामूहिक पठणाच्या माध्यमातून त्या स्तोत्रपरंपरा समाजापर्यंत पोहोचवित आहेत.
धार्मिक उपासनेसह समाजातील महिला व कुटुंबांना भारतीय संस्कृती आणि स्तोत्रपरंपरेशी जोडणारा हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल नवी मुंबई कासार समाज महिला मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे मंदिरांमध्ये धार्मिक वातावरणाबरोबरच ज्ञान, संस्कार आणि सामूहिक साधनेची परंपरा अधिक दृढ होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रकाश राव, सुनील लोखंडे, शोभा तिवाटणे, शेखर कोकिळ आणि सागर मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रज्ञाताई पंडित यांनी आयोजकांचे आभार मानले.
प्रा. प्रज्ञा पंडित यांचे विष्णुसहस्रनाम निरूपण संपन्न



